chessbase india logo

जी. एच. रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजी नगर स्पर्धा दिमाखात संपन्न

by Vivek Sohani - 05/03/2025

जी. एच. रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजी नगर आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आणि कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) आणि फिडे यांनी मान्यता दिलेली असून या स्पर्धेतील बक्षीस रक्कम रायसोनी फाउंडेशनतर्फे प्रायोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय मास्टर रवी तेजा व कुशाग्र मोहन यांच्यासह वेदांत पानेसर, आकाश दळवी, सुयोग वाघ, गौरांग बागवे, प्रीयान्षु पाटील हे फिडे मास्टर, वैभव राऊत, वेदांत पिंपळखरे हे कॅन्डीडेट मास्टर आणि वूमन फिडे मास्टर ऋतुजा बक्षी, वूमन कॅन्डीडेट मास्टर तनिशा बोरामणीकर व संस्कृती वानखेडे असे नावाजलेले खेळाडू स्पर्धेत आपल्या कौशल्याचा कस लावून विजेतेपदा साठी चढाओढ करताना आपल्याला दिसले. या स्पर्धेत एकूण ३२४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. फोटो - विवेक सोहनी

या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती गजाला शेख, प्राचार्य, हिमालय पब्लिक स्कूल यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला श्री. हेमेंद्र पटेल (सचिव, औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटना), श्री. भूषण श्रीवास (सचिव, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन), IA अजिंक्य पिंगळे (मुख्य पंच), FA अमरीश जोशी (उप-मुख्य पंच), आणि एस. एस. सोमन (सदस्य, MCA ऑब्झर्व्हर कमिटी) उपस्थित होते. | फोटो - भूषण श्रीवास

फिडे मास्टर आकाश दळवीने जिंकला जी.एच.रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजीनगर फिडे रेटिंगचा किताब

स्पर्धेचा प्रशस्त हॉल | फोटो - भूषण श्रीवास

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना मान्यवर | फोटो - भूषण श्रीवास

FM आकाश दळवीने ९ पैकी ८.५ गुण मिळवून स्पष्ट विजेतेपद पटकावत रु. ५०,०००/- रोख बक्षीस आणि चमकदार ट्रॉफी जिंकली. तेलंगणाच्या अव्वल मानांकित IM कुशाग्र मोहन याने ८ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले आणि त्यांना रु. ३०,०००/- चे रोख बक्षीस मिळाले. FM गौरांग बागवे (महाराष्ट्र) यांनी देखील ८ गुण मिळवले, मात्र टाय-ब्रेक स्कोअरनुसार त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. FM सुयोग वाघ, वेदांत पिंपळखरे, FM वेदांत पानेसर, प्रियांशू पाटील आणि वैभव राऊत यांनी ७.५ गुण मिळवले आणि टाय-ब्रेक स्कोअरनुसार अनुक्रमे चौथ्या ते आठव्या स्थानांवर राहिले.

बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धेचा विजेता आकाश दळवी याला सन्मानित करताना मान्यवर | फोटो - भूषण श्रीवास

मुख्य अतिथी श्री. अरविंद ढोबळे, IRS (सहाय्यक आयुक्त (निवृत्त), सेंट्रल GST) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी श्री. दिलीप वाकोडे (जनरल मॅनेजर, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज लिमिटेड), श्री. हेमेंद्र पटेल (सचिव, औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटना), श्री. भूषण श्रीवास (आयोजक सचिव व सचिव, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच IA अजिंक्य पिंगळे (मुंबई) होते, तर FA अमरिश जोशी (उपमुख्य पंच) यांनी त्यांना सहकार्य केले. याशिवाय FA सागर साखरे, FA सतीश ठाकूर, FA अमित टेंभुर्णे, FA विलास राजपूत, SNA प्रयास अंबाडे, SNA शिशिर इंदूरकर, कृष्णा ठाकूर, केतकी देशमुख, प्रथमेश मचावे, पुष्कर डोंगरे आणि अभिजित वैष्णव यांनी पंच म्हणून काम पाहिले.

इतर विशेष बक्षीसे

मुख्य व उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या खेळाडूंसह उपस्थित मान्यवर | फोटो : भूषण श्रीवास

मुख्य गटात टॉप 15 खेळाडूंना रोख बक्षीसे देण्यात आली. त्याशिवाय सर्वोत्तम वरिष्ठ खेळाडू (५५+), सर्वोत्तम महिला खेळाडू (१८+), सर्वोत्तम छत्रपती संभाजीनगर खेळाडू, सर्वोत्तम अनरेटेड खेळाडू, १४००-१६०० आणि १६०१-१८०० रेटिंग गटातील सर्वोत्तम खेळाडूंना रोख बक्षीसे देण्यात आली. लहान मुलांच्या वयोगटातील सर्वोत्तम खेळाडूंना (अंडर- ७,९,११,१३ आणि 1५) ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

महत्वाच्या लिंक :

१. चेस - रिझल्टस - अंतिम निकाल

२. बक्षीस विजेत्यांची यादी :

 

 



Contact Us